काळजी घ्या
कुणीतरी असावे जवळचे
काळजी घ्या म्हणणारे।
माणसे तर खूप आहेत
फक्त नसावे संख्या सांगणारे।।
कधीतरी मायेचा हात असावा
आपल्या दु:खाच्या वेळी।
सुखात तर असतात सर्वजण
पण दु:खात धावणारे असावे वेळोअवेळी।।
कुणाच्या नुसत्या शब्दाने
वाटावा जीवनाला आधार।
कुत्सित काहीतरी बोलून
मनाला न करावे निराधार।।
स्वार्थ साधून घेण्यासाठी
असतात बरीच जवळ माणसे।
निस्वार्थपणे धावणारे असावित
मोजकीच आपली खास माणसे।।
आपल्या माणसांकडे बघून
यावा हूरूप जगण्याला।
त्यांच्या नुसत्या आठवणीने
वाटावा आनंद मनाला।।
प्रत्येका जवळ असतात
अशी मोजकीच माणसं प्रेमळ।
त्यांना खास मनातून जपावे
काढून खास अमूल्य वेळ।।
काहींचे नशिब असते थोर
त्यांना भेटतात बरेच जण।
प्रेमळ शब्द करतात जादू
म्हणून धावून येतात बरेचजण।।
प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment