येणे आणि जाणे
माणूस जातो कुठेही
परत आपल्या जागी येण्यासाठी।
येतो आपल्या ठिकाणी
परत कुठेतरी जाण्यासाठी।।
जाणे येणे हा तर असतो
माणसाचा नित्यक्रम।
प्रत्येकाला करावेच लागते
रोजचे नेहमीचे काम।।
नसली इच्छा तरी
कुठेतरी जावेच लागते।
वाटत नाही स्वत:ला
तरी यावेच लागते।।
जाणे येणे बहूधा
आपल्या हाती नसते।
घडते एखादी घटना
तेव्हा जावेच लागते।।
जातो माणूस काहीवेळा
परत मात्र येत नाही।
येतो माणूस बर्याच वेळा
परत जाता येत नाही।।
जन्माला येणे हाती नसते
कुठे होईल जन्म माहीत नाही।
मरण कधी हेहि हाती नसते
कसे येईल ते ही सांगता येत नाही।।
येरझार नाही चुकली कुणाची
माणूस आहे पाहूणा जगातला।
किती दिवस आहे मुक्काम
हे माहीत नसते कुणाला।।
येताना सर्वांना होतो आनंद
जाताना मात्र रडवून जातात।
येताना करतात जीवाचे स्वागत
जातांना मात्र पोरके करतात।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment