प्रेम
पडावे स्वत:च्याच प्रेमात
एकदा कधीतरी जीवनात
ओळखून घ्यावे स्वत:ला
आणि पुन्हा राहू नये भ्रमात
करावा स्वत:शीच संवाद
मन सारे मोकळे करून
हलके वाटेल स्वत:लाच
अश्रूही येतील मदतीला धावून
फिरावे असे एकटेच
निसर्गाच्या सानिध्यात
मोकळा श्वास घेऊन
भरून ठेवावा अंत:करणात
नटावे मुरडावे खुदकन
गालात कधीतरी हसावे
आरशा समोर उभे राहून
स्वत:चेच रूप पाहावे
मस्तपैकी हाॅटेलात जावे
मनसोक्त ताव मारावा
सिनेमा नाटकाला लावावी हजेरी
सगळा ताण विसरून जावा
कधीतरी भटकंती करावी
लुटावा आनंद प्रवासाचा
स्वत:लाच विचारावा प्रश्न
का विचार करतो कमीपणाचा
गाडी चालावी लांब प्रवासाला
छान ऐकत मधूर गाणी
धरावा गाण्यावर ठेका
एकरूप होऊन जावे स्वत:च्या मनी
जन्माला येतो एकटा
जातांनाच जातो एकटाच
मग जीवनात एकदा तरी
जगून बघावे एकटाच
कधीतरी स्वत:लाच डोळे
पाहावे भरभरून
विचारावा प्रश्न मनाला
आहे मी खरा कोण
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment