अपेक्षा
आंधळा म्हणतो एक तरी
डोळा हवा होता मला
मुका असलो तरी चालले असते
सृष्टी मिळाली असती बघायला
मुका म्हणतो बहिरा
झालेले चालले असते
पण गोड शब्दाने
दुनिया जिंकायला झाले असते
बहिरा म्हणतो थोडा अपंग
झाले असते तर चालले असते
पण गाणे संगीत यांचा
आस्वाद घेता आले असते
अपंग म्हणतो पैसा नसता
तरी कमवला असता
पण शरीराने धडधाकट
पाहिजे होता
धडधाकट म्हणतो दिसायला
मी हवे होते सुंदर
त्याच्यामुळे जसा पाहिजे
तसा मिळाला असता जोडीदार
नोकरीवाले म्हणतात थोडा
अजून पगार असायला हवा
परदेशात फिरायला जाऊन
केली असती पालट हवा
पायी चालणारा म्हणतो
सायकल पाहिजे होती
सायकलवाल्याला वाटते
मोटर सायकल हवी होती
मोटर सायकलवाल्याला वाटते
एक कार पाहिजे जवळ
कारवाल्याला वाटते जुनी विकून
आलिशान असावी जवळ
कुणीही कुठे नाही
दिसत आपल्या ठिकाणी समाधानी
असते नुसतीच कायम हाव
असतेच नेहमी बेचैनी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment