यात्रा
आलो आहोत आपण
काही दिवस यात्रेसाठी
विसर पडला काहींना
आलो आहोत परत जाण्यासाठी
सगळ्यांचा विचार करता करता
स्वत:चाच विचार करायचा राहिला
सगळ्यांच्या सुखासाठी झटता झटता
स्वत: मात्र कायम दु:खी झाला
राग लोभ मत्सर झाले
आपले खरे मित्र
त्यामुळे झाली नाही आपली ओळख
स्वत: अज्ञानी राहिलो मात्र
ज्याची घ्यायची होती ओळख
ती राहिली कोसभर लांब
नुसत्या बिनकामाच्या उठाठेव करून
करत राहिलो वायफळ बोंबाबोंब
निघून चालले आहे आयुष्य
कायमचे आपल्या ओंजळीतून
कशासाठी जगतो आहोत
यातच संपत आहे जीवन
सकाळ पासून ज्याला बघावे
तो नुसता सुटतो धावत
पण धावून शेवटी काय मिळणार
हेच मात्र नाही कळत
आता लागलो होतो नोकरीला
भराभर वर्ष गेलीत निघून
रिटायरमेंट जवळ आली
बरेच करायचे गेलो विसरून
समोरच्याशी कधी हसलो नाही
नाही कधी गोड बोललो
आता वेळ निघून चालली
चांगल्या गोष्टी करण्यासाठी नाही थांबलो
मुले बाळे घर पैसा नोकरी गाडी
हेच होते का उद्दिष्टे जीवनाचे
जीवनाच्या अंती काहीच येत नाही बरोबर
विसरून गेलो खरे काय होते मिळवायचे
जन्माला येण्याचा उद्देश काय
हेच मात्र घेतले नाही जाणून
मृगजळा मागे धावत धावत
संपून जाते अमुल्य जीवन
याचा बदला त्याचा बदला
याचाच विचार होतो करत
शेवटी सारे व्यर्थ ठरवून
मृत्यू करतो सगळ्यांवर मात
पशूपक्षी हे ही करतात
संसार संसार
त्यांच्यात आपल्यात काय फरक
आपणही करतो संसाराचाच विचार
दुसर्याच्या मृत्यूसाठी वाटते
आपल्याला हळहळ फार
विसरलो आपण स्वत:ला
एक दिवस आपल्यालाही जावं लागणार
बराच वेळ वाया घालवला
नाशिवंत गोष्टी मिळवण्यासाठी
शेवटी गुरू आहे महत्वाचा
खर्याची जाणीव करून देण्यासाठी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment