माणसाच्या हातात काय
मारतो माणूस मोठमोठ्या गप्पा
असे करीन तसे करीन
पण काय आहे माणसाच्या हातात
उगीचच गर्वाने भरते मन
पुढच्या क्षणाला काय होईल
हे कुणालाच नाही माहीत
मग फुकटच्या बढाया
काहीच उपयोगाच्या नाहीत
जन्म आणि मरण याबद्दल
काहीच माहीत नसते माणसाला
पण कुणाचा कसा बदला घ्यायचा
याबद्दल वेळ देतो घालवायला
जीवनात पुढे काय वाढून ठेवले
हे कुणालाच सांगता नाही आले
अंदाज बांधून फक्त बोलायला उरते
हेच नशिबी माझ्या आले
पैसा जरी येत नाही बरोबर
तरी जीवनात आहे त्याची किंमत
कधी येईल व कसा जाईल
हे मात्र कुणाला सांगता नाही येत
मरण समोर पाहून
भल्याभल्यांची त्रेधापीठ उडते
काहींचा जात नाही अहंकार
मोलाचे आयुष्य वाया जाते
मंगळावर जाण्यासाठी माणूस
पाठवतो यान
पण नाही सांगता येत त्याला
पुढच्या क्षणाला येणारच नाही मरण
विश्वाचा पसारा बघून
माणसाची वाचा होते बंद
मोजक्या ग्रहांचा अभ्यांस करून
क्षणिक मिळतो फक्त आनंद
का जन्माला घातले माणसाला
याचे उत्तर नाही कुणाकडे
अंदाज बांधतात सर्व वेगवेगळे
सगळ्यांचे उत्तर असते वाकडे
आता उरलो उपकारापुरता
अशी भावना ठेवावी मनात
मिळालेले अमूल्य जीवन
खर्चावे इतराच्या जीवनात
ज्याला कळले जीवन
त्याच्यात येते नम्रता
एकटा राहूनही राहतो आनंदी
कारण त्याचा सोबती असतो अनंता
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment