कांदा
एकवेळ आली होती अशी
कांद्याला देत नव्हते कुणी किंमत
शेतकरी फेकत होते रस्त्यावर
बिचारा पडून राहायचा निपचित
कुणी त्याचे खत करायचे
तर कुणी जनावरांना द्यायचे खायाला
फुकट घेत नव्हते कुणी कांदा
शेतकर्यांना वाटायचे उगीच तो पिकवला
कांदा गेला देवाच्या पायी
केली विनवणी त्याने देवापाशी
माझे महत्व वाढू दे
नारळ फोडीन तुझ्या पायाशी
ऐकले देवाने कांद्याचे गार्हाणे
येईल तुला खूप महत्व
लोकं तुला प्रेमाने कुरवाळतील
वाटेल तुझ्याप्रती त्यांना ममत्व
कांद्याचे महत्व वाढले
तो जाऊन बसला सफरचंदाजवळ
सगळ्यापाशी एकच चर्चा
असावा फक्त कांदा जवळ
एक किलो कांद्याने
डाॅलरलाही मागे टाकले
हाॅटेलातून गायब झाला कांदा
सोन्यासारखे भाव त्याचे झाले
कांदा आहे ज्याच्याजवळ
त्याला समजतात श्रीमंत
आणले मिरवून कांद्याला
मोजून चांगली किंमत
रस्त्यावरचा कांदा गेला
उंचच उंच गगनावरी
काहींना दिसत नाही तो
त्यांच्यापासून आहे तो दूरवरी
कांद्याने आणले शेतकर्यांच्या
डोळ्यात आनंदाचे अश्रू
गोरगरिबांच्या डोळ्यांत मात्र
आणलेत त्याने दु:खाश्रू
कांद्याचे शेतकरी बर्याच वर्षानी
चांगलेच सुखावले
कर्ज बर्याच जणांचे फेडून
दोन पैसे गाठीशी राहिले
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment