जीवन हे माणसाला पडलेले स्वप्नच
ज्यावेळी माणसाला स्वप्न पडते त्यावेळी स्वप्नात त्याला कळत नाही की हे स्वप्न आहे .खरं मानूनच स्वप्नात तो व्यवहार करतो .काही वेळातच परदेशी सुद्धा फिरून येतो .सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा त्याला कळतं की स्वप्न होते ते .जोपर्यंत स्वप्न होते तोपर्यंत स्वप्नातच जगत होता पण जागृत अवस्थेमुळे ते स्वप्न नाहीसे होते व जे स्वप्नात पाहिले ते खरे नव्हते असे त्याला जागे झाल्यावर कळते पण स्वप्नात तो रडतो कधी आनंदी होतो कधी कधी सगळीकडे फिरून येतो पण स्वप्न पाहणार्यापेक्षा तो मात्र वेगळा आहे झोपलेला आहे हे त्याला स्वप्न असेपर्यंत कळतच नाही .जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला वाटू लागते की मी वेगळा आहे व जे पाहिले तो भास होता त्याचप्रमाणे माणूस जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत हे जे चालले आहे ते स्वप्नच की .ह्या स्वप्नात आपण आनंदी होतो दु:खी होतो व आपण खरे कोण हे मात्र विसरुन जातो कारण आपल्याला अजून जागच आलेली नाही त्यामुळे हे सर्व खरं मानून चालतो आहे .संताना जागृत अवस्था प्राप्त झालेली असते . स्वप्नाच्या अवस्थेतून जेव्हा जागृत अवस्था प्राप्त होते तेव्हा त्यांना हे जग स्वप्नवत भासायला लागते पण जग त्यांना वेड्यात काढते.संतांची झोप कधीच उडालेली असते म्हणून ते टाहो फोडतात की अरे हे जीवन हे स्वप्न आहे त्यामुळे दु:खी कष्टी होऊ नका .त्या स्वप्नातून जागे व्हा म्हणजे सुख व दु:ख जे भोगले त्याची झळ बसणार नाही तसेच जे सुख दु:ख येणार त्याबद्दल विचलित मन होणार नाही.ज्या दिवशी माणूस मरतो त्यादिवसापासून त्याचा संबंध पूर्ण तुटतो फक्त कागदपत्री त्याचा संबंध उरतो .त्यानंतर त्याला कोणती अवस्था प्राप्त होणार हे सांगणे कठीण आहे पण संताच्या बाबतीत जीवंतपणीच ते स्वप्नातून जागे होतात व जगाला सांगत सुटतात की जीवन हे एक स्वप्न आहे त्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही.संताना जीवंतपणीच मी चा साक्षात्कार होतो व त्यामुळे त्यांना कळून चुकते की जे घडते ते एका शक्तीमुळे घडते आहे आपण एक निमित्तमात्र असतो . आपल्याला पडलेले स्वप्न हे वेगळे व संताना दिसलेले स्वप्न वेगळे . ते जागे करण्याचा प्रयत्न करतात पण पण आपल्याला जाग मात्र येत नाही .नको त्या पदाला नको त्या प्रतिष्ठेला नको त्या मानपानाला खरं मानून पूर्ण जीवन वाया घालवतो .शेवटी जसे इतर प्राणी जातात तसा माणूस कोणताही देवाचा साक्षात्कार न घेताच जातो .मुलांना शिकवले त्यांचे लग्न केलेत दोन चार बंगले घेतलेत गाड्या घेतल्यात म्हणजे जीवनाचा हेतू साध्य झाला व ते करण्यासाठीच देवाने जन्म दिला होता हे समजून आयुष्य हातातून निघून जाते. शेवटी मी कोण याचे उत्तर न मिळताच आयुष्य संपून जाते .माझ्याशिवाय कुणालाच कळत नाही .मीच श्रेष्ठ अशा भ्रमात माणूस एक एक दिवस फुकट घालवतो त्या श्रेष्ठाची अनुभूती मात्र त्याला कधीच येत नाही व खर्याच्या ओळखीपासून दूर राहतो .जेथे संत जागे असतात तेथे आपण मात्र झोपलेलो असतो व जेथे ते झोपलेले असतात तेथे आपण जागे असतो
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment