जसे पेराल तसे उगवेल
जसे जमीनीत आपण बी टाकतो व त्याला वातावरण योग्य लाभले की त्याला अंकुर फुटण्यास सुरवात होते व ते वाढायला लागते .जे बी टाकणार तोच वृक्ष तयार होणार व तशीच फळं हे लागणार त्याचप्रमाणे आपण जाणते अजाणते कर्म करत असतो व प्रत्येक कर्माचे फळ हे ठरलेले असते म्हणजे आपणच आपल्या जीवनाची दिशा निश्चित करत असतो .आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो .जे कर्म केले तेच काही दिवसांनी काही महिन्यांनी काही वर्षानी काही जन्मांनी आपल्याकडे परत येते .माणूस कर्म करतांना विचार करत नाही पण जेव्हा ते परत येते तेव्हा मग गडबडून जातो व आपल्या नशिबाला दोष देतो पण आपणच केलेले कर्म आपल्याकडे परत येत असते .बर्याच वेळेला आपल्याला माहीतही नसते की आपण ते कर्म केलेले होते .म्हणून कर्म करतांना फार विचारपुर्वक केले पाहिजे.आपण जसे दुसर्याशी वागतो तसेच कुणीतरी आपल्याशी तसेच वागणार त्यामुळे दुसर्याशी बोलतांना वागताना प्रेमपूर्वक भाषा वापरली पाहिजे .ज्यांना ह्या गोष्टीवर विश्वास असतो ते कधीही घमेंडीने बोलत नाही किंवा तुसडेपणाने बोलत नाही .मोठे लोक जे असतात ते नम्र असतात की ज्यांना हा नियम कर्माचा माहीत असतो. विज्ञानही म्हणते क्रिया तशी प्रतिक्रिया असते .लोकांना क्रिया करायला न विचार करता आवडते पण परतावा जेव्हा येतो तेव्हा हे माझ्याच वाट्याला का आले असे म्हणत असतात. काहींना दुसर्याला त्रास द्यायला आवडते .कुचकट बोलणे ही त्यांची फॅशन झालेली असते .दुसर्याचा पदोपदी अपमान करणे म्हणजे त्यांची जीवनशैली झालेली असते .दुसर्याला सहज शिव्या देणे म्हणजे त्यांचा हातखंडा झालेला असतो पण जे कराल ते भोगायला तयार राहिले पाहिजे. हा जन्म अपूर्ण पडला तर पुढच्या जन्मी तर नक्कीच ते भोगावं लागते म्हणून कर्माकडे फार सावधगिरीने बघायला पाहिजे व जर चांगला परतावा पाहिजे असेल तर चांगले कर्म केले पाहिजे. चांगले व वाईट कर्म म्हणजे नक्की काय? परोपकार ते पुण्य पाप ते परपीडा अशी सोपी व्याख्या संतानी दिलेली आहे. काहीवेळा दुसर्याला अजाणतेपणाने आपल्याकडून त्रास होतो तेव्हा कदाचित ते समोरच्याच्या कर्माचा परतावा असू शकतो पण जेव्हा ठरवून कट करून विचार करून जेव्हा दुसर्याला आपण हानी पोहचवतो तेव्हा तो समोरच्याचा परतावा नसून ते आपले कर्म झाले व त्याचा परतावा आपल्याला नक्की मिळणार म्हणून केलेल्या कर्माला योग्य वेळ मिळाला की त्याचे परतणे आपल्याकडे सुरु होते व ते कुणीही अडवू शकत नाही .बरेच जण जेव्हा वाममार्गाने अनियतीने पैसा कमवतात तो पैसा व्याजासकट आपल्याला द्यावा लागणार मग एकतर आजारपणामुळे पैसा खर्च होणार किंवा मुलं दारूच्या पायी वाया जाणार किंवा कोणत्या तरी मार्गाने तो वाममार्गाने कमावलेला पैसा व्याजासकट तो निसर्ग वसूल करतो .बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment