लोखंड ,परीस व मानवी जीवन
लोखंड व मानवाची तुलना केल्यास दोघांमध्ये काहीच फरक नाही कारण लोखंडाची झिज होऊन एक दिवस ते मातीत मिसळून जाते तसेच माणसाचे आयुष्य हे कमी कमी होत जाऊन ते ही मातीत एक दिवस राखेच्या रुपाने मिसळते पण जर लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते व ते सोने मातीत जरी कितीही वर्ष राहिले तर ते तसेच राहते त्याची चमक कमी होत नाही .मातीत ,चिखलात, अग्नीत सोने राहिले तर ते चकाकुन उठते .लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला म्हणून त्याला ही अवस्था प्राप्त झाली .जर त्याला परिसाचा स्पर्श झाला नसता तर मात्र ते लोखंड मातीत झिजुन नष्ट झाले असते तसेच माणसाचे आहे जोपर्यंत माणसाला परिसासारखा सदगुरु लाभत नाही तो पर्यंत माणसाचे जीवन वाया जात असते .पण एकदा का सदगुरु भेटला व त्याच्या ज्ञानाचा आपल्याला स्पर्श झाला की मग आपण कोणत्याही क्षेत्रात असो किंवा कोणत्याही ठिकाणी असो किंवा कोणत्याही मित्रांच्या संगतीत असो आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही .सोन्यासारखे आपले जीवन सदगुरुंच्या ज्ञानाने उजळून निघते मग सदगुरु माणसाच्या रुपात असेल किंवा ग्रंथांच्या रुपात असेल .समाजातील वाईट प्रवृत्तीचा, वाईट व्यसनांचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही म्हणून आपल्या जीवनाला परिसरुपी सदगुरुंचा स्पर्श म्हणजेच सहवास हवा असतो . असा सदगुरु मिळणे हे सगळ्यांच्या भाग्यात नसते .सदगुरु लाभल्याशिवाय जीवनाचे सत्य आपल्याला कळत नाही .संसाराच्या सुखदु:खात आपण वाहून जातो किंवा गटांगळ्या खातो .संत म्हणतात पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सदगुरुचा तोचि जाणे .म्हणजेच पूर्व जन्माचे सुकृत पूर्ण अभ्यांस व सदगुरु यांचा मिलाप ज्यांच्या जीवनात आहे तोच जाणतो जीवनाचे सत्य .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment