गड्या आपुला गावच बरा
मित्रहो आपण जे घडतो ते आपले लहानपण कसे गेले यावर अवलंबून असते .जे गावाने अनुभव दिलेत ते कुठेच मिळू शकत नाही हे मात्र नक्की.शहरातील मुलांना जे मिळत नाही ते सहजच मला मिळत गेले पण तेव्हा त्याची किंमत नव्हती.आज मात्र त्याची खूप किंमत वाटते मग लहानपणी विटू दांडूचे खेळ असो लपाछपीचे खेळ झाडांवर चढणे उतरणे त्यांचे खेळ हे आजही आठवतात .मला आठवते लहानपणाचा एक माझा मित्र होता त्याची आज आठवण येते मी होतो तेव्हा पाचवी सहावीला व माझा मित्र 60 ते 65 वर्षाचा त्यांचे नाव होते चिंधू कासार .आमच्या घराजवळच राहायचे संध्याकाळी आरती करायचे व मला बोलवायचे व मीही त्यांच्याबरोबर आरती करायचो म्हणजे कळत नकळत देवाचे संस्कार मनाच्या पटलावर उमटत होते व आज त्याचा किती उपयोग झाला ते शब्दांत सांगणे कठिण .आईवडील वारकरी पंथाचे असल्याने सतत किर्तन प्रवचन संताच्या कथा तासनतास घरात चालायच्या त्यामुळे देवाबद्दल आकर्षण वाटायला लागले .कठिण परिस्थितीत कसे जिंकायचे ते कळले .
निताणे गावाभोवती सगळीकडे डोंगर आहेत त्या डोंगरावर म्हशी गाई बकर्या यांना चारायला घेऊन जायचो कधी म्हशीच्या पाठीवर बसायचो कधी पाण्यात तिची शेपटी धरुन पाण्यात उतरायचो.मजा वाटायची .अभ्यांस करायला वेळ थोडा मिळायचा कारण शेतीत आईवडिलांना मदत करणे हे प्रथम व अभ्यांस करणे हे दुय्यम मग कधी आंब्याच्या झाडावर उंच ठिकाणी जाऊन बसायचे अभ्यांसाला व जोरजोरात उत्तर बोलून पाठ करायचे .कधीकधी रात्रंभर जागायचो अभ्यांसाला .आता आम्ही सांगतो मुलांना अभ्यांस करा पण मला सांगायचे एवढा अभ्यांस करु नको.अभ्यांस काहीही करुन पूर्ण करायचा असा माझा प्रयत्न राहायचा. गावात अक्षयतृतीयाचा तमाशा ,नदीत कुस्त्या हे बघायला फार आवडायचे तसेच होळीसाठी कुठुन कुठुन सर्व लाकडे काटे गोळा करायचे व होळी पेटायची तेव्हा चोरुन कुणाच्या तरी ताटातून पुरणपोळी पळवणे व उकीरड्यावर खाणे की त्यामुळे कोणते आजार होत नाही असे सांगितले जायचे .दिवाळीला फराळासाठी जाणे आणि संक्रांतला तिळगुळ वाटायला जाणे मोठ्या लोकांच्या पाया पडणे थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवणे व तिच्याभोवती मित्रमंडळी बसुन गप्पा जोक्सस करायचे व मजा यायची.पावसाळ्यात नदीला पूर यायचा शेत तुडूंब पाण्याने भरायचे विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाट तसेच उन्हाने तापून निघालेली जमीनीवर जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा जो मातीचा सुगंध दरवाळयाचा त्याची बरोबरी कोणत्याच सुगंधाने होऊ शकत नाही ते बघायची मजा काही औरच होती .गारा वेचायच्या रेतीचे घर बांधायचे .कागदाची होडी बनवायची व ती पाण्यात सोडायची पण आता ते सारे हरवले आहे.शेतातील गुरे म्हणजे जणू घरातील सदस्य.जेव्हा आमची व्यालेली गाय गेली तेव्हा आम्ही घरातील सर्व रडत होतो कारण ते प्राणी नव्हते तर ते घरातील सदस्य जणू होते. शाळेतील शिक्षक जरा कडक शिस्तीचे होते त्यामूळे शिस्त अंगी जी आली ती त्यांच्यामुळेच.कापूस शेंगा बैलगाडीवर बसुन सटाण्याला विकायला वडिलांबरोबर जायचो आज कारमध्ये बसुन ती मजा येत नाही मग भजी खायचो .काहीवेळा पायी पायी हे गाव ते गाव जाणे .पायात चप्पल नसल्याने चटके बसायचे तेव्हा रस्त्यात शेणात पाय बुडवून पायाला गारवा निर्माण करायचो.मामाच्या गावाला पायी जाणे किंवा मामाच्या सायकलीवर जाणे तसेच आखतवाड्याच्या जत्रेत जाणे व नुसती कुल्पी खाणे फुगा घेणे .शाळेत जातांना आई रस्त्यात भेटायची गाईचे दूध घेऊन येतांना व रस्त्यातच दुध पिणे .मधल्या सुट्टीत भाकरी लोणचे मिरचीचा ठेचा खाणे .हरभरा मळ्यात कचरा पेटवून त्यावर भाजणे व मग गप्पा मारत खात बसणे . विहीरीत उतरुन शिकाळीने माती काढणे घणाने खडक फोडणे .शेती नांगरतांना देवाचे भजन म्हणणे .रात्र रात्र बैलगाडी फिरवुन बाजरीचे दाणे काढणे व त्या मोबल्यात जिलेबी खायाला मिळत होती.आई माहेराला गेली की वडील मित्रांना घेऊन रात्री बर्फी करायचे व ती बर्फी आम्ही मित्र रात्री अभ्यांस करतांना खायचो अशी मजा शहरातील मुलांना कधीही अनुभवता येणार नाही .पैशांची किंमत ही कशी ठेवायची व्यसनापासून लांब कसे राहायचे देवाचे नाव का घ्यायचे हे लहानपणी आईवडिलांकडून तसेच गावातील किर्तनातून वारकरी यांच्या मुखातून नेहमी ऐकायला मिळायचे.म्हणून गावातील त्या आठवणी जीवन घडायला कारणीभूत ठरले.
आजही काही महिने झाले की गावाची आठवण येते व गाव तसेच शेतात फेरफटका मारला की ताजेतवाने वाटते व मग तो शुद्ध आॅक्सिजन बरेच महिने पुरतो .जन्मभुमीसारखे तिर्थस्थान नाही .बरेच लोक गावाकडे कधी फिरकत नाहीत कारण एकमेकांबद्दल करुन घेतलेला गैरसमज तिरस्कार घृणा द्वेष मत्सर हा पुरेपूर त्यांच्या मनात भरलेला असतो .गावात असलेला आपला शेतकरी भाऊ याबद्दल अभिमान वाटण्याऐवजी काहींना लाज वाटते .त्याच्या घरी येणे जाणे नसते की त्याला प्रोसाहन त्यांना देता येत नाही व आयुष्य निघून चालले तरी ते त्यांना आपल्या मनातून द्वेषाची भावना गैरसमज काढणे जमत नाही .जरी गावात कधी आले तर मी कोणत्यातरी मोठ्या पदावर आहे हा अभिमान मनात ठेवूनच वावरत असतात त्यामुळे गावात येऊनही निख्खळ आनंद त्यांना घेता येत नाही.मायभूमीशी एकरूप होता येत नाही त्यामुळे मायभुमीचे दर्शन घेऊनही बिगर आशिर्वादाने त्यांना परतावे लागते .आपली मायभूमीची माती मस्तकाला लागल्याशिवाय जीवनात शांती येणे अवघड आहे .सर्व तिर्थाहून महान आपली मायभूमी असे अनेक संतानी वर्णन केले आहे .तिच्या कुशीतच आपले पालनपोषन बालपण गेले त्यामुळे तिला विसरणे शक्य नाही . आपली जन्मभूमी व तेथे आपली माय असेल तर मग ती भूमी वैकुंठाहूनही महान असते . ज्याला गाव आहे व माय आहे तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस होय .दोघांचे दर्शन घेतले की शांतीचा अनुभव येतो व म्हणावेसे वाटते आता कोठे धावे मन। तुझे चरण देखियेले ।भाग गेला शीण गेला । अवघाचि उरला । आनंद।।
दगा देवरे
Comments
Post a Comment