आयुष्य
छान छान दिसावे म्हणून
करतो माणूस नेहमी धडपड
पैसा नेहमी खर्च करुन
समस्यांची थांबवतो पडझड
इस्रीचे कपडे डोळ्यावर गाॅगल
मनगटी महागडे घड्याळ
चालत नाही कधी तो पायी
फिरतो गाडीत सकाळ संध्याकाळ
बाता मारतो तो मोठमोठ्या
प्रभाव पाडतो सगळ्यांवर
इगो असतो भरलेला त्याच्यात
दाखवतो तो जीवनभर
पैसा संपत्ती पद ओळखी
याशिवाय बोलत नाही काही
माझ्याशिवाय कुणीच नाही श्रेष्ठ
असे बोलत असतो काहीबाही
मृत्यूचा विचार येत नाही कधी
समजतो आपण आहोत अमर
शरीराला सजविण्यासाठी घालतो
आयुष्य त्यासाठी आरपार
हातात घालतो सोन्याचे कडे
गळ्यात असतात सोन्याच्या माळा
शेवटची घटका भरल्यावर
पडतात फुलांच्या माळा
मृत्यू जेव्हा जवळ पोहचतो
तेव्हा सर्व अहंकार गळतो
शेवटी मात्र घालतो झडप
मग निपचित तो पडतो
ज्या शरीरावर करत होता गर्व
ते पडले आहे सरणावर
सगळ्यांच्या देखत त्याला
तूप टाकून जाळणार
पैसा संपत्ती पद नातलग
हे राहते आपल्या जागी
देहाची होणार राख
हे वास्तव आहे जगी
राजा असो की रंक
गरीब असो की श्रीमंत
निघतो पुढच्या प्रवासाला
कधीच येत नाही परत
माणूस एकदा गेला की
दिसत नाही त्याच्या पाऊलखूणा
होता आपल्या बरोबर सहप्रवासी
दिसत नाही त्याचा ठावठिकाणा
चालता बोलता दिसणारा
गायब झालेला दिसतो
काही कळायच्या आत
फोटोत जाणून बसतो
आयुष्य आहे क्षणभंगूर
चिंतेने भरु नये मन
एक छातीतली कळ
संपवते आपले जीवन
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment