मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोरं
बहिणाबाईंनी मनाचे वर्णन फार चांगल्या प्रकारे केले आहे.मन माणसावर नेहमी आरुढ होत असते.जसे मन सांगेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो .मनामागे माणूस फरफटत जातो .जर मनाचे विचार चांगले असतील तर मग चांगला मार्ग सापडतो व माणसाचे कल्याण होते पण जर मनातील विचार चांगले नसतील तर मग मात्र माणसाचे अतोनात नुकसान होते .छोट्या छोट्या गोष्टीवरुन मन माणसाला उकवसते व त्याचे रुपांतर भांडणात होते व अनर्थ घडतो .पाणी जसे नेहमी उताराकडेच धावते तसे मन हे नेहमी वाईट विचार करण्यात मग्न असते .पाण्याला वरच्या बाजूने नेण्यासाठी विशिष्ट मशिनचा उपयोग करुन चढवले जाते त्याचप्रमाणे मनात चांगले विचार हे आपोआप येत नाहीत तर प्रयत्नपूर्वक त्यात आणावे लागतात .त्यासाठी अनेक मार्ग आहेत .मनाची एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे जर काही दिवस एकच गोष्ट नेहमी करत राहिलो तर ती अंगवळणी पडते व मन करायला तयार होते .चांगली गोष्ट असेल तर चांगलेच होते पण वाईट गोष्ट अंगवळणी पडली तर मग मात्र माणसाचे पतन होते.काही दारू, सिगारेट तंबाखू, बिडी, गूटखा खाण्याची सवय लावून घेतात व ब्लू फिल्म ,वासना चाळवणारे व्हिडिओ व फोटो नेहमी बघत असतात व गप्पा मारतांना वासना जागृत होतील अशा मारतात त्यामुळे माणसाचे मन ही तसेच तयार होते व त्या मनाला नंतर कितीही चांगले सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होत नाही म्हणून माणसाने ठरवायचे की मनावर आरुढ व्हायचे की मनाला आपल्यावर आरुढ होऊ द्यायचे .काहीजण सगळ्या प्रकारचे काम करतात पण ते मनावर आरुढ होतात .मनाने अनेक माणसांना थोर केले तर काहींना तळाला घातले .मन असे का वागते तर मनाला जे खाद्य आपण पुरविणार तसे मन वागते.मनाचे खाद्य आहे विचार .जसे विचार पुरविणार मनाला तसे मन बनते .चांगले विचार दिले तर चांगले होईल व वाईट विचार पुरविले तर वाईट होते.मनात विचार आले की आपले इंद्रिय सक्रिय व्हायला लागतात व सक्रिय झालेत तर त्याचवेळी कृती करतात किंवा काही वेळाने काही दिवसांनी त्यांच्या हातून तशी कृती घडते .मोठ्या श्रीमंताची मुलेही वाममार्गाला लागलेली दिसतात कारण मनाला त्यांनी लावलेली सवय म्हणून आपल्या प्रगतीला व अधोगतीला मनच कारणीभूत असते व मन हे आपण पुरविलेल्या विचारांवर अवलंबून असते .छोट्या छोट्या संकटात काहीजण कोसळतात पण काहीजण मोठ्या संकटातुनही मार्ग काढतात .मनाचा संकुचितपणा हा माणसाला तळाला घालतो तर मनाचा मोठेपणा निस्वार्थीपणा माणसाला मोठे करतो मनाला चांगल्या विचारांनी प्रसन्न केले तर ते सिद्धीचे कारण ठरते.मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे यात चांगल्या विचारांनी प्रसन्न हा अर्थ अभिप्रेत आहे.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment