पाऊसाचा लपंडाव
नको खेळू रे लपंडाव पाऊसा
तुझी वाट पाहून थकले रे आता
डोळे लागले आहेत तुझ्या येण्याकडे
का वागतोस रे तु असा अनंता
शेतकरी झाले कासाविस
गुराढोरांना नाही चारा पाणी
सारे रान पडले ओस
तुझ्याशिवाय नाही रे कुणी
लोकांना नाही मिळत कामधंदा
लागली त्यांना पोटाची चिंता
मुलांच्या सुरू झाल्या शाळा
शाळेसाठी पैसे कोण देईल आता
तुझ्याविना चेहरे झाले उदास
गेला आनंद हिरावून
खेळू दे मुलांना चिखल पाण्यात
उत्साही कर सर्वांचे मन
नको होऊ नाराज असा
तुला नाही तो अधिकार
आम्ही सारी तुझीच लेकरे
तुचं आहे आमचा आधार
गर्जना करत येरे पाऊसा
विजांचा होऊ दे कडकडाट
दाखव तुझा मर्दपणा
कर ढगांचा तू गडगडाट
अंथर सृष्टीवर हिरवी चादर
सांग पक्ष्यांना त्यावर बांधायला घरटे
भरु दे धनधान्यांनी घरे
दिसू दे शेतात हिरवी रोपटे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment