चालणे
दिसतो प्रत्येक जण चालतांना
कुठेतरी जायचं असतं प्रत्येकाला
कुणी तर धावत असतात
काहीतरी पकडायला
पृथ्वी चालते चंद्र चालतो
सुर्य असतो मात्र स्थिर
त्याच त्याच वाटेने चालतात
नाही जात सूर्यापासून दूर
माणूसही आयुष्यभर असतो
चालत कधी पळत
काहीतरी मिळवण्यासाठी असतो
मात्र नेहमी धडपडत
पशूपक्षी किटक प्राणी
असतात चालत पळत नाहीतर उडत
पोटापाण्यासाठी असते धावपळ
म्हणून असतात ते भटकत
काहींना नसते माहीत
चालून चालून जायचे कुठे
जिकडे रस्ता दिसेल तेथे
चालून मारतात फक्त खेटे
काही चालता चालता
रस्ता मात्र चुकतात
जीवनभर सैरभैर होऊन
पदरात काहीच नाही त्यांच्या पडत
प्रत्येकाला असते संध्याकाळी
घराची लागलेली ओढ
काहींना मात्र उशिरा
येण्याची असतेच कायम खोड
अतिलोभाने काही फक्त
पळत असतात
काहीच नाही मिळाल्याने
शेवटी निराश होतात
काहींचा चालण्याचा रस्ता
असतो ओबडधोबड
काट्याकुट्यांमधून चालुन चालून
उभे राहता येत नाही त्यांना धड
एक दिवस चालणे
कायमचे संपून जाते
शेवटी त्याला पोहचवण्यासाठी
लोकांचे चालणे मात्र चालू असते
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment